अशक्य ते शक्य

श्री. विजय वाटाणे हे त्याकाळी प्रचलित वैद्यकप्रणालीचे सूक्ष्मदर्शी अभ्यासक, थोर समाजसेवक, बुद्धिप्रामाण्यावादी, विद्वत्रत्न डॉ. केशव लक्ष्मण उपाख्य भाऊजी दप्तरी यांचे नातू, भाऊर्जीनी त्यांना बाराक्षार चिकित्सा पद्धतीची दीक्षा दिली. तसेच त्यांच्या दवाखान्यात मदतनीस म्हणूनही काम करण्याचे सौभाग्य त्यांना लाभले. त्यामुळेच श्री. वाटाणे यांच्या प्रस्तुत विषयाच्या अभ्यास कक्षा रूंदावल्या. त्यांच्यात एक संशोधक वृत्ती निर्माण झाली तसेच, त्यांच्या अभ्यासाला एक तात्त्चिक बैठक प्राप्त झाली. 'अशक्य ते शक्य' या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या या उपक्रमाच्या साक्षी त्यांच्या पत्नी सौ. विजया वाटाणे यांच्या जन्मदिवशी होत आहे. त्यासाठी होमिओपॅथीक वैद्यकीय शिक्षण व व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात मोलाचे योगदान असलेले डॉ. सुनील पारसे व विद्वत्रत्न कै. भाऊजी दप्तरी स्मारक आयोजित बाह्यरुग्ण विभागात कार्यरत असलेल्या डॉ. मधू अगरवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. हा एक दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. बायोकेमिक चिकित्सा पद्धतीत दिल्या जाणारी औषधे ही शरीरातील क्षार आहेत. हे मिनरल या सदरात मोडत असून त्यांचे कार्य एकमेकांना पुरक आहे. या औषधांत शरीराच्या आत खोलवर झालेला विकास दुरुस्त करण्याची क्षमता आहे. शिवाय एकाच वेळी आवश्यकतेनुसार अनेक औषधांचा रोगाच्या लक्षणानुसार उपयोग केल्या जातो. रोगांच्या तीव्रतेनुसार या औषधाच्या उच्च मर्दनाच्या मोजक्याच मात्रा कायमस्वरूपी रोगमुक्ती करण्यासाठी द्यावा लागतात. तर काही कष्टसाध्य रोगात सुरुवातीला कमी मर्दनाची औषधे द्यावीत व पुढे हळूहळू उच्च मर्दनाची औषधे वापरावीत. त्यामुळे कायमस्वरूपी रोग निवारण होते. चिकित्सा करतांना केवळ लक्षणांचाच विचार न करता रक्त तपासणी, क्ष किरण चिकित्सा, इ.सी.जी. आदी तपासण्यांची गरज व आजाराचे योग्य निदान करण्यावरही श्री. वाटाणे यांनी भर दिला आहे. इतर चिकित्सा पद्धतीला दूषण न देता त्या शास्त्राच्या चिकित्सकांचा विश्वास संपादन करण्यावर लेखकाचा विशेष भर आहे. तसेच बाराक्षार पद्धतीबाबतची शक्तीस्थळे व मर्यादा यांचा योग्यप्रकारे आढावा घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात झालेला आहे. प्रस्तुत पुस्तकात आहार व पथ्य यावर विशेष भर दिला असून सहज सुलभ पद्धतीने घरात उपलब्ध साधनांचा उपयोग औषध योजनेत केला आहे. काय खावे व काय खाऊ नये जसे गॅस्ट्रोच्या आजारात अति लंघन देणे बरोबर नसून त्या अवस्थेत पचेल असे पोषण देणे आवश्यक आहे. तापात प्रथिनेयुक्त पदार्थ किंवा मुगाच्या डाळीचे सूप द्यावे इ. बाबींचे विवरण प्रत्येक रोगात केल्याचे आढळते तसेच पथ्याच्या भाज्यांची यादी परिशिष्ट २ मध्ये नमुद आहे.

सुबोध चिकित्सा व सामान्य रोग

होमिओपॅथिक व बायोकेमिक चिकित्सापद्धतीचे मध्यभारतातील प्रणेते होत. तेव्हाचे जुन्या मध्यप्रांताचे आरोग्यमंत्री बॅरिस्टर डॉ. दादासाहेब बारलिंगे यांच्या सहकार्याने डॉ. भाऊजी दप्तरी यांनी राज्यात 'होमिओपॅथिक व बायोकेमिक प्रॅक्टिशनर्स अॅक्ट' मंजूर करवून महाराष्ट्र व मध्यप्रदेशात या चिकित्साप्रणालीला राजमान्यता मिळवून दिली. डॉ. भाऊजी हे या राज्याच्या 'होमिओपॅथिक व बायोकेमिक बोर्डा'चे पहिले अध्यक्ष, तसेच 'नागपूर होमिओपॅथी महाविद्यालया'चे आद्य संस्थापक व प्रथम प्राचार्य होते.

वैद्यकीय शास्त्रातील अनेक चिकित्सापद्धतींचा प्राधार व तुलनात्मक अभ्यास करून भाऊजींनी असा सिद्धांत मांडला की, शरीरावर कोणतीही क्रिया केली असता, शरीर ती नुसती सहन न करता त्याला प्रतिक्रिया करते, व याच नियमानुसार रोग साध्य, कष्टसाध्य किंवा असाध्य आहे असे ठरविता येत असून होमिओपॅथी हीच खरी चिकित्सा (सच्चिकित्सा) होय. डॉ. भाऊजी दप्तरी यांचा हा सिद्धांत डॉ. हॅनिमन यांच्या सिद्धांताशी अनुरूप असून होमिओपॅथी चिकित्सापद्धतीची कारणमीमांसा सिद्ध करण्यास पुरेसे पाठबळ देणारा आहे.