कहाणी सत्यशोधकाची

'कहाणी सत्यशोधकाची' ही विद्वद्रत्न कै. केशव लक्ष्मण उपाख्य भाऊजी दप्तरी यांचे जीवनदर्शन घडविणारी चरित्रात्मक कादंबरी वाचकांच्या हाती देतांना मला विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत विषयावर लिहिण्यासाठी लेखणी उचलताना मजकडून मर्यादेचा अतिक्रम तर होत नाही ना? अशी शंका मला आली नाही असे नाही. मी एक साधारण ललित लेखक, योगायोगाने भाऊजींचा नातू एवढ्याच सामर्थ्यावर एवढे धारिष्ट्य करण्याचे ठरविले. त्यांचे कारण एकच. भाऊजींच्या महानिर्वाणाला आता जवळजवळ शेहेचाळीस वर्षे होत आलीत. पण अशा प्रकारचा प्रयत्न कोणी मान्यवर लेखकाने केलेला नाही. (निदान माझ्या तरी माहितीत नाही). भाऊजी दप्तरींच्या साहित्य सूचीच्या प्रकाशनाचे वेळी प्राचार्य राम शेवाळकर (डि.लिट्.) यांनी भाऊजींचा गौरव ते विद्वत्तेचे मौंट एव्हरेस्ट आहेत व त्याचे आरोहण करणारा तेनसिंग अद्याप जन्माला यायचा आहे, असा केला होता. एवढे सर्व माहीत असूनसुध्दा मी त्यांच्या जीवनावर चरित्रात्मक कादंबरी लिहिण्यासाठी लेखणी उचलली. कारण 'ब्रह्मर्षी सत्यकाम' हे त्यांच्याच जीवनावर आधारलेले पण काल्पनिक नाटक लिहितांना त्या ललित प्रकाराच्या स्वाभाविक मर्यादांमुळे भाऊजींच्या अनेक स्वभावदर्शनाच्या बाबी राहून गेल्या असे असमाधान मनात बोचत होते. 'वेडे वाकुडे गाईन परि तुझा म्हणवीन' असे तुकाराम महाराजांनी म्हणावे त्याच चालीवर मी माझे असे समाधान करून घेतले आहे की भाऊजींचे ऋण म्हणून का होईना पण आपणच 'स्वांतसुखाय' हे धाडस करावे. ते कितपत साध्य झाले आहे हे वाचकांनीच ठरवायचे आहे. इथे मला आणखी एक नमूद करावयाचे आहे की भाऊजींच्या गोळा केलेल्या अनेक आठवणींमधून ज्या आठवणींतून भाऊजींचे व्यक्तिमत्व प्रकर्षाने उठून दिसेल असे मला वाटले त्याच आठवणी व घटना मी कादंबरीत वापरल्या आहेत. स्थल संकोचास्तव, जो स्वभावविशेष आधीच कादंबरीत प्रकट झालेला आहे त्याची द्विरूक्ती टाळली आहे.