संमोहातुन उठले गांडिव
संमोहातुन उठले गांडिव, निनादला रणी टणत्कार, होई नूतन जयजयकार, भीमथडीची तट्टे सजली सिध्द व्हावया अटकेपार मेवाडीचा सिंह गर्जला, धगधगला पुनरपि जोहार, संथालाची वाणी घुमली वंदेमातरम्चा जयजयकार रणकुंडाच्या वेदीवरती आहुती शहिदांच्या पडणार आसेतुहिमाचल भारतभू एस रसानें रसरसणार हिमालयाच्या म्लान मुखावर धवलहास्य विजयी फुलणार शांतीचा अन् मानवतेचा वेदघोष गगणी उठणार भरतभूमि अग्निदिव्यातुन नवतेजाने प्रकाशणार
देव राडूने ग्रासला
आज लोखंडा लपवी स्टेनलेसचे पॉलीश जुन्या कसोट्या बालीश आज सभ्य नि असभ्य सुखे नांदती एकत्र पुरे नायलॉन छत्र आज यंत्रे सुत्रधार चाले बाहुल्यांचा खेळ वर्तुळात फिरे काळ आज भिंगले देऊळ तडा गेला पावित्र्याला देव राहूने ग्रासला
वेडगळ
"कटीचे सोडूनडोक्याला बांधले समाजी फॅशन मान्यता पावले. जनसेवा हीच खरी ईश सेवा, मुखी मंत्र ज्याच्या खाईल तो मेवा. श्रध्दा आणि निष्ठा कशावर आता?" "कोणत्या युगांत राव वावरता? मानवाची झेप जिंकी अंतराळ.भूमीचे बंधन मानी
रानफूल
कणांकणातील यौवन रस तू शोषुन घेई भ्रमरा रे ! एकनिष्ठता नसे अपेक्षा रानफुल मी कमल न रे ! तव अलिंगन धन्य त्याग क्षण, गळेल हें तन नंतर रे पुन्हा पुन्हा पण जन्मां येईन, भोगाया क्षण एकच रे ! ह्या फेऱ्यांतच मोक्ष असे, मम, मुक्तात्म्याला अनुया रे !
हाय !!!
हाय !!! एकार पेटलेल्या विट्टेषाच्या ज्वाला पोटात साठवून धगधगणारी राख, शांत करण्यास धडपडलें, 'ताश्कंद' पण.... हाय !!! शांतीची, मानवतेची भरतखंडात तेवणारी प्रकाशज्योत..... मालवून बसलें, त्या खटपटींत
तेव्हां !--
माता ग्क्षाया रैवताचे पाट, हाडां-मासाचें बनेल खत. घामाचा नित्य पूर वाहील, समद्धि-मळा वेगें पिकेल. विश्वाचें गुढ बुद्धि शोधील. भेदाभदांचे भूत गाडील. दीनांचा ताप अश्रू हारील, मातेचें भाग्य तेव्हां हसेल
अर्धचंद्र
हृदयीच्या रॉकेटमध्ये काही काळ बंदिस्त करुन, अनंत उंचीवर दिलेस फेकून (भयाण अंधाऱ्या पोकळींत) भ्रमतो आहे तुझ्या भोवती, निराधार... तेव्हापासून (वजन रहित स्थितींत) जन-कुतुहल नजरांचे उपहासित भक्ष्य बनून
डोळे वाहून वाहून
डोळे वाहून वाहून आता कोरडे जाहले मन मात्र आत ओले ओझे वाहून वाहून हात शीणले, कांपती मजा साथ नच देती अजूनहि धावायाला मन तसेंच तयार पाया सोसवेना भार आता टाकुनिया देह साथ देईल जो मना असा नेसावा तरणा
पहाट
पहाटेचे वेळी आता लोपली भूपाळी पाण्यासाठी, दुधासाठी पेंगतात लांब ओळी पहाटेचे वेळी जाते ओवी नाही गात आता पिठाच्या चक्कीचे सुरु होतसे संगीत पहाटेचे वेळी कुठें सडा नि रांगोळी ? रोज अंघोहीची गोळी सुरु होते दिन पाळी पहाटेचे वेळी उष्मामुख न आस्ल रोज रविमुख्य म्लान भर दुपारची भ्रांत
भस्मासुर
भस्मासुर चिरनिद्रे मधुनी आज परत जागविला आहे. चराचराचे भस्म कराया हस्त उगारुन टपला आहे. अहमंनय जनकाला अजुनी स्वामित्वाची धुंदी आहे. अजाण, भोळ्या महेशास हा, मनांत चोरुन हसतो आहे. देव कोण अन् दानव कोण ? पर्वा त्याला मुळीं न आहे चिरशांती - साम्राज्य स्थापण्या राख..... राख हा उपया आहे. मोहिनीच्या कपट - नीतीला भक्ष्य पुन्हा नच मिळणारा हे चराचरासह भस्मासुरही भस्मी शांती घेणारा हे !
नवयुग
नव्या युगाची व्योमभरारी सरपटणाऱ्या भोवळ आणी भूल मध्ययुगीन भोगांची चढवून जगणे केविवाणी बुरसटली संस्कारवाळवी पडके वाडे पोखरता हे टेरिलीनचा तोरा ताठर अंतरातुनी खचला आहे कचाकडी - नीतिमुल्ये पडली अडगळींत, निजकणा मोडुनी यांत्रिक रोलर क्रूर, आंधळा, फिरे सारख्या सर्वांवरुनी
मधुप
सळसळणाऱ्या मासोळी सम चमचमणारी नजर भासते लवलवत्या वेतासम काया मखमलीस स्पर्शी लाजवते कुंभ दोन रक्षी हुचमळतीगजनगतींत तू जेव्हा फिरते नागिण काळी नितंबावरती फणा काढुन धुंद डोलते तारुण्याचा वसंत फुललागात्रोगात्री तव चारुलते सुंदरतेचा रसिक मधुप मी वेडावुन तव गातो गीते.
संधी
मनोहारी फुलं रानीं फुलतात, सुगंध अंशतः न रसिक पाणीदार मोती शिंपल्यात बदंद सागरी निर्बंध किरणांना मौल्यवान हिरे खार्णीच्या गर्भात शोधकाची वाट युगे युगे जगीं मिरविते नकली अस्सल अंधारी अस्सल संधीविना
वेडे वय
डोळ्यांमधली फुलली स्वप्ने प्रत्यक्षातच उभवु पाहणे माहिती नसतो शब्द अशक्य वेडे वय हे असते एक सौंदर्याने भान हरपणे,कारुण्यां बघुनी विरघळणे, करण्याला ढोंगाला उघडे धडपडते कडवे वय वेडे उभारुन परकोट छातिचा प्रयत्न होतो विमोचनाचा बाहुबलाचा नसे विवेक वेडे वय हे असते एक अभिमन्यू, शिवबा, ज्ञानेश्वर, भगतसिंग, आगरकर नरवर, ह्याच वयाने वेडे झाले इतिहासीं अजरामर ठरले
खंत
बाहुपाशांत वर्षेच्या आंत कोरडा फरार ग्रीष्मताप साहतांना स्मरे ओलावा अंतर नेत्रांतील आर्जवाला उपेक्षेची केर-पेटी आज भ्रमता अंधारी स्मरती कां नेत्रज्योती ? पायीं पउल्या मिठीला समजलों तेव्हां वेडी, थकलेल्या, पोळलेल्या पावलांना आस वेडी शिंते संपलीं, पळालीं, भुतें तत्क्षणीं - ओंगळ, जीवनाच्या सायंकाळीं वाटे एकाकी, व्याकूळ.
पुलाखालती गलिच्छ ओंगळ
पुलाखालती, गलिच्छ ओंगळ सुरकतलेल्या जरा पांघरुन, लष्करांतलें दैन्य मानवी बसले होतें ओंजळ पसरुन पूर्वजन्मकृत कर्म फळांनी पांडित्याने ओंजळ भरली दुर्देवाने भूक न शमली दान कुपात्री - वाट सुधारली बहुजन सुखाय || बहुजन हिताय || मोर्चा गेला नारे लावून, अपार करुणा - महापुरांतुन ओंजळ उरली कोरडीच पण टाळ, मृदंग नि वीणा वादन हरिनामाचे अखंड कीर्तन धुंद भक्तिला घडलें नाही व्याकुळ नयनीं हरिचें दर्शन कुणी वेडपट धोंडे खाऊन तिथेंच आला, ओंजळ पाहून हललें काही विकृत मेंदूत पाव चोरलां, गेला टाकुन
व्यर्थ !
निश्चित जाहलो खणून काढली वाढल्या रोपांची पाळेमुळे.... अवाचित भेटे श्रावणची सर तरारुन वर आले जुने !
वेड
'मारडाला' नजरेचे तीर जाहले बोथटं, 'दिलखेचक' हास्याला असमर्थ नकली दांत गिरेबाज कबुत्तर आज दीनवाणी झाली, यौवनाच्या भरतीला आता ओहोटी लागली नग्नतेच्या भांडवली किर्ति-नफा मिळविला, पूजा कलेची बांधाया कधी नव्हता उमाळा, उल्का आता विखळली वितळली विस्मृतींत, प्रकाशाचें वेडें वेड नाही सोडता सुटत
तृष्णार्त
बहरानं न्हाहलेल्या चमेलीचा गंध ओला जुन्या दर्दी पवनाच्या रोमारोमांत भिनला तारकांची भरजरी चंद्रकळा निशा ल्याली, काममोहित चंद्राच्या आलिंगनी रोमांचली अशा रात्री अशा वेळी प्रतिशराब पासून, का रे गेलास निघून तृष्णा अर्धी जागवून ?
सल-
आकाशीच्या नीळाईला जेव्हा तांबडं फुटलं माझ्या जीवनाचं तारु सागरात मी लोटलं कधी सोसले तडाखे कधी न्हाहलो ओढात अंकुरले ना मनात सारे संपेल क्षणात मस्त यौवनवातान अहंशील फुगाविले नसे खेद आणि खंत जरी तारु भटकले उतरली उन्हं आता जरी संध्या नसे झाली जाणिवेचा सल सले रात्र काळी गोठलेली
सवाल
ह्या जगण्यामध्यें कशी असावी धुंद ? नभ ढगाळलेले, दिशा जाहल्या कुंद मम पहिल्या उड्डाणांतच तुटले बंद अन् स्वैर विहरण्यां कायमचा प्रतिबंध आशेचा जळला मोहर विद्युतपाता अन् उरांत उरला वांझपणा-सल सलता, ह्यां जगांत जगतों, जड झालों जगताला खळगीला भरण्यां जागवितो करुणेला मोहोळ डिवचलें अशात जेव्हां जातें. पांगळ्या तनूला जागोजागीं डसतें. वासनाडोंब मग डसळे ह्या देहांत, "का असली शिक्षा?" सवाल विव्हळ मनांत
चाहूल
माझ्या ग अंगणात मुक्त धारांनी नाचावे थुईथुई नाचण्यानं डोळे माझे नीववावे माझ्या ग अंगणात इवल्या पाखरांनी यावे सुमधूर कुंजनानं माझे अंगण भरावे. माझ्या ग अंगणात फुलबाग बहरावी मुग्ध, नाजूक फुलांनी शांत, प्रसन्न हसावी आता असं बाहेरुन यावं फुलून जीवन आज अनेक युगांनी त्याची चाहूल आतून
असे वाटते
असे वाटते गालावरल्या खळीत मोहक बुडून जावे किंवा तव हास्याची खळखळ ऐकत त्यातच वाहत जावे | असे वाटते तव नयनांच्या काठी बैसुन तळ निरखावे किंवा कुरळ्या दाट कुंतली शिरुन त्यातच विरुन जावे | असे वाटते करस्पर्शातुन अबोध, मृदुमधु भाव कळावे किंवा उत्कट बंधनात तळ मी माझेपण हरपावे | असे वाटते तव हृदयातच मम हृदयाचे स्पंदन व्हावे किंवा प्रेमाच्या वेदीवर मम प्राणांचे तर्पण व्हावे ।
बाबुगिरीच दुनिया
येन्नं गा बाबू पेन्न गा चाहा तुझ्ये वाढले दाहा तुझे माझे वाढले दाहा.... तू आन् मी लागलो एका दिसी तवापासून तुले मी सांगतो युगत खासी दिवसभर हिंड पन लेट बसून राहा तुझे माझे वाढले..... दाहा || दिवसभर तू मरमर मरते घराले बी आनिक फायली घेऊन जाते येवढं करुन काही तुजं नांव नाही पाहा तुझे माझे वाढले..... दाहा|| नाव नसन, नसो । सी. आर. साफ असो केली खराब हालत मनून जीव तुटे माहा तुझे माझे वाढले..... दाहा|| दिवसभर हिंडतो आन् राजकारन चिडवतो हॉटेलात खरा मिठाचाय पन दडपतो पानसिगरेटीचा खर्च कधि नसे माहा.... तुझे माझे वाढले...... दाहा|| टेबलावर माझ्या मंग जवा काम साठे त्याले हात लावायाले आंगी येई काटे मेडिकलघेऊन घरी बसतो मोजून हप्ते सहा तुझे माझे ..... दाहा|| कोणी तरी तुझ्यावानी काम करते ? आपण आपल मजेत हाव दुनियेत हेच चालते बाबुगिरीची दुनिया न्यारीअसं समजून राहां तुझे माझे वाढले..... दाहा||